

बेळगाव : युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी मिरजमधून अटक केली होती. त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केली होती. त्यांना बुधवारी (दि. 25) विशेष दंडाधिकारी व पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी जामीन मंजूर केला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे.
किणयेतील तरुणाचा सत्कार करून दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी शेळकेंना सोमवारी (दि. 24) त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी (दि. 25) जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. बुधवारी सुनावणी होऊन त्यांना पाच लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. शुभम यांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.
रात्री उशिरा शुभम यांची कारागृहातून सुटका झाली. यावेळी म. ए. युवा समितीचे धनंजय पाटील, अशोक घगवे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अनिल हेगडे, पिराजी मुचंडीकर, बापू भडांगे, प्रवीण रेडेकर, भागोजी पाटील, मनोहर हुंदरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मातृभाषा मराठीसाठी आजपर्यंत मी काम केले आहे. यापुढेही करत राहणार आहे. आतापर्यंत कायदा हातात घेतलेला नाही. यापुढेही कायदा मोडणार नाही. आम्हाला जाणूनबुजून त्रास करत असाल, तर तो त्रास सहन करण्यास आम्ही तयार आहोत. मातृभाषेसाठी सर्वांनी एकजुटीने काम करूया, असे आवाहन शेळके यांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर केले.