डीजेमुळे चित्ररथ मिरवणुकीला विलंब

शिस्त पाळणार्‍या मंडळांवर होतोय अन्याय ः प्रेक्षकांचाही हिरमोड
DJ ban demanded in Shivjayanti parade
संग्रहित छायाचित्रfile photo
Published on
Updated on

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डीजेला फाटा देत शिवकालीन सजीव देखावे अधिक संख्येने सादर करावेत, असा सूर शिवभक्तांमधून उमटत आहे. त्यामागे कारणेही तितकीच आहे. डीजेमुळे मिरवणुकीला विलंब होत असल्याचे कारण प्रमुख आहे.

मिरवणुकीत डीजे लावल्याने युवक थिरकू लागतात अन् मिरवणुकीचा वेग मंदावतो. एकाच ठिकाणी अर्ध्या तासाहून अधिक काळ चित्ररथ थांबून राहिल्याने इतर चित्ररथांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, चित्ररथ मिरवणूक लांबते व वेळेत संपत नाही. डीजेबरोबर ढोलताशा, झांजपथक, लेझीम पथके एकाच ठिकाणी बराच वेळ वादन करत असल्याने मिरवणूक थांबते. या प्रकारामुळे लाखो रुपये खर्च करुन सजीव देखावा सादर केलेल्या मंडळांवर अन्याय होतो. मिरवणूक लांबल्याने प्रेक्षकांचाही हिरमोड होतो अन् ते परतीच्या वाटेला लागतात. 15 ते 20 मिनिटे वादन केल्यास शिवभक्तांना चित्ररथ पाहताना अडचणी येणार नाहीत.

शिवकालीन देखावे सादर करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना फार परिश्रम घ्यावे लागतात. काही दिवस नियमित सराव करावा लागतो. एक सजीव देखावा सादर करण्यासाठी किमान 50 हजार ते लाखभर रुपये खर्च होतात. हा खर्च देणगीरुपातून जमा केला जातो. मात्र, डीजे व वेगवेगळ्या वादन पथकांमुळे मिरवणूक थांबत असेल तर देखावे सादर करण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच मिरवणूकही लांबत जाते.

वरील प्रकारांमुळेच डीजेच्या वापराला वाढता विरोध होत आहे. काही ठराविक मंडळेच डीजे लावतात. पण, त्याचा परिणामसंपूर्ण मिरवणुकीवर होतो. त्यामुळे, मंडळांनी डीजेचा वापर टाळणे आवश्यक बनले आहे. तसेच वादन पथकांनी वेळेची मर्यादा पाळली तरी मिरवणूक लांबणार नाही.

शहरवासीय दरवर्षी चित्ररथ मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहत असतात. पण, ती वेळेत पूर्ण होत नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होतो. सर्व चित्ररथ शिस्तीनेे मुख्य मिरवणूकीत सहभागी झाल्यास प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल. डीजेचा आग्रह मंडळानी न धरलेला बरा.

मेघन लंगरकांडे, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव मंडळ, माळी गल्ली

गेल्या 50 वर्षांपासून आमचे मंडळ केवळ सजीव देखावे सादर करत आले आहे. यंदाही हीच परंपरा कायम ठेवणार आहोत. सर्व मंडळांनी डीजेला फाटा देत सजीव जिवंत देखावे सादरीकरणावर भर दिल्यास चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण वाढेल.

अतुल कडेमनी, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव मंडळ, मारुती गल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news