DK Shivkumar: डीकेंच्या हाती 'शिव'धनुष्य

'टीम शिवकुमार' ११ जणांची : दुपारी होणार शपथविधी; सिद्धरामय्यापुत्र यतिंद्र, सतीश जारकीहोळी पहिल्या यादीत, राज्यसभा निवडणुकीनंतर दुसरी यादी
DK Shivkumar: डीकेंच्या हाती 'शिव'धनुष्य
Published on
Updated on

बंगळूर : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून दोड्डलहाल केंपेगौडा शिवकुमार अर्थात डी. के. शिवकुमार बुधवारी शपथ घेतील. त्यांच्यासोबत एकूण ११ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यात मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र आणि विधान परिषद आमदार यतिंद्र यांचाही समावेश आहे. खुद्द सिद्धरामय्यांनी पुत्राच्या मंत्रिपदाला विरोध केला असला, तरी शिवकुमारांनी यतिंद्र यांना आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ नेते सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील हेही मंत्रिपदाची शपथ घेतील. बेळगाव जिल्ह्यातून तूर्त जारकीहोळी यांचेच एकमेव नाव शपथ घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार येत्या १८ जूनरोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर होणार आहे. ज्येष्ठ मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निश्चय शिवकुमारांनी केला असल्याने नाराजांना सांभाळत दोन वर्षे कारभार सांभाळण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे. मंत्रिमंडळ रचनेबाबत नवी दिल्लीत मंगळवारी सकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला एआयसीसीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राज्याचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, निर्दिष्ट मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात मोजक्या जणांचा शपथविधी करण्याचे नियोजन होते. परंतु, इच्छुकांची संख्या वाढल्याने आमदारांच्या दबावाला बळी पडून हायकमांडने पहिल्या टप्प्यात ११ जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या घरातील कोणालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये, अशी भूमिका सिद्धरामय्यांनी घेतली होती. परंतु, शिवकुमार यांनी पुढाकार घेत यतिंद्र यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे.

बुधवारी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात डॉ. जी. परमेश्वर, एम. बी. पाटील, के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील, डॉ. एच. सी. महादेवप्पा, प्रियांक खरगे, रूपकला शशिधर, यतिंद्र सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद हे शपथ घेतील. मंत्रिमंडळातील बहुतांश जुन्या मंत्र्यांना डावलण्याची चर्चा करण्यात आली. ज्यांनी आजपर्यंत मंत्रिपद भूषविले आहे, त्यांनी पुढील निवडणुकीत पक्षासाठी काम करावे, अशी अपेक्षा शिवकुमारांनी व्यक्त केली. त्याला आक्षेप घेत सिद्धरामय्या यांनी मागील मंत्रिमंडळात ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यांचा फेरविचार करावा, असे सुचवले.

वेळ : दुपारी ४.०५, उपस्थिती : सर्व धर्मांचे गुरू

लोकभवन येथे दुपारी ४.०५ मिनिटांनी डी. के. शिवकुमार व अकरा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. लोकभवन येथील काचघरात (ग्लास हाऊस) येथे शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीची जोरदार तयारी केली आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, एआयसीसीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सर्व धर्मांच्या ५५ धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले आहे.

माजी खासदार डी. के. सुरेश यांनी लोकभवनाला भेट देऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. लोकभवनाबाहेर रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. परिसरातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. शपथविधी सोहळा पाहण्याची सोय व्हावी यासाठी एलईडी स्क्रीन लावले आहेत. कार्यक्रमाला जास्त लोकांनी येऊ नये, अशी विनंती केली जात आहे. सुरुवातीला सुमारे २० हजार लोक सहभागी होतील, असे सांगण्यात आले होते. तथापि, हायकमांडच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे साधेपणाने आयोजन केले आहे. यापूर्वी शिवकुमार २०२३ मध्ये मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर आता शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news