

बंगळूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंचहमी योजनांपैकी एक असलेली शक्ती योजना आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. सेवा आणि विश्वासार्हता यासह अनेक कारणांमुळे देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या या योजनेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता या योजनेने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळवून जागतिक विक्रम नोंदवला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या पंचहमी योजनांपैकी शक्ती योजना पहिल्यांदाच लागू करण्यात आली. 11 जून 2023 रोजी लागू झालेल्या या योजनेंतर्गत, केएसआरटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी, बीएमटीसी आणि केकेआरटीसीमध्ये महिला प्रवाशांनी 504 कोटी 90 लाख वेळा प्रवास करून एक नवीन विक्रम रचला आहे. याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणात दिलेल्या योगदानाचा विचार करून हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले, शक्ती योजनेने महिलांना आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम केले आहे. शक्ती योजना पाहून देशातील विविध राज्यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा आणखी एका जागतिक विक्रमात समाविष्ट होणे ही अभिमानाची बाब आहे. चारही महामंडळांचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार नेते आणि महिला प्रवाशांचे त्यांनी आभार मानले.