Belagavi news: ज्येष्ठ डॉक्टरने गोळी झाडून जीवन संपवले

कर्करोगाला कंटाळून टोकाचे पाऊल; बेळगावातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
Belagavi news: ज्येष्ठ डॉक्टरने गोळी झाडून जीवन संपवले
Published on
Updated on

बेळगाव : फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या असह्य वेदनांना कंटाळून शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवन संपवल्याची घटना शुक्रवार, दि. २२ रोजी सकाळी गोडसेवाडी-मंडोळी रोड परिसरात घडली. डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९, रा. कृपा निवास, पहिला क्रॉस टिळकवाडी- गोडसेवाडी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. रुग्णांना जीवदान देणाऱ्या एका ज्येष्ठ डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडून घेतल्‍याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मूळचे कारवार जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. भटकळ यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते बेळगावातील गोडसेवाडी-मंडोळी रोड येथे वास्तव्यास होते. काही काळापासून त्यांना गंभीर स्वरूपाचा कर्करोग झाला होता. उपचार सुरू असतानाच ते मानसिक तणाव आणि नैराश्यात होते.

शुक्रवारी सकाळी आपल्या बंगल्यातील बेडरूममधील बाल्कनीत त्यांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ हे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून फुफ्फुसाच्या चौथ्या टप्प्यातील कर्करोगाने त्रस्त होते. आजारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. शुक्रवारी पहाटे त्यांनी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डाक्‍टरना मोबाईलवर संदेश पाठविला होता. छातीत असह्य वेदना होत असून मी अंतिम निर्णय घेत आहे. माझ्या कुटुंबाला मदत करा, असा उल्लेख त्या संदेशात होता. याचबरोबर बेळगाव पोलिस आयुक्तांनाही याची माहिती द्यावी, असादेखील त्या संदेशात उल्लेख होता.

या घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्‍यांच्‍या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्यांच्या मुलग्याने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास टिळकवाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news