

बेळगाव : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवार, दि. 29 रोजी शाळांना प्रारंभ झाला. अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांतून स्वच्छतेचे काम पूर्ण झाले नसल्याने शुक्रवार, दि. 30 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली आहे. अनेक शाळा सुरू झाल्यामुळे परिसर गजबजून गेला होता. काही वर्दी रिक्षावाल्यांनी एक जूनपासून येणार असल्याची माहिती दिल्याने पालकांना आपल्या पाल्यांनाशाळेत सोडणे भाग पडले. पहिल्या दिवशी शाळेच्यवतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फुल, पाठ्यपुस्तके व खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षण खात्याच्यावतीने पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागतची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश मिळाले की नाही याची पाहणी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी केली.
विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण खात्याच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी चिमुकले भारावून गेले होते. पहिलीच्या मुलांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. खासगी शाळांमध्येही प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी वर्दी रिक्षावाले, पालकांची धावपळ पाहायला मिळाली. काही रिक्षाचालकांनी आपण 1 जूनपासून येणार असल्याची माहिती पालकांना दिली. त्यामुळे पालकांना स्वतः मुलांना शाळेत सोडावे लागले.
काही शाळांतून स्वच्छतेचे काम पूर्ण न झाल्यामुळे शुक्रवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. 2 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. सुट्टीत पाठ्यपुस्तके घेण्यासाठी वेळ न मिळालेल्या शिक्षकांनी चव्हाट गल्ली येथील शाळा नंबर 5 मधील गोदामात पाठ्यपुस्तके घेण्यासाठी गर्दी केली होती. यंदा 100 टक्के पाठ्यपुस्तके वितरणाचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र 90 टक्के पाठ्यपुस्तकाचे वितरण झाले असून अजून 10 टक्के पाठ्यपुस्तकाचे वितरण बाकी असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.