

बेळगाव ः माझे वडील मुख्यमंत्री सिद्धरामय्या सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन काम करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच मंत्री सतीश जारकीहोळी यांची भूमिका असून ते त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येतील. त्यांनी येत्या काळात राज्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र आमदार डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केले.
बुधवारी (दि. 22) रायबागमधील एका कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी डॉ. यतिंद्र बेळगावात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, वडील सिद्धरामय्या 2028 ची निवडणूक लढविणार नाहीत. त्यांच्यानंतर धर्मनिरपेक्ष काँग्रेस विचारसरणीचे पालन करणारे अनेक राजकारणी आहेत. त्यांचे नेतृत्व करण्याची कुवत मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यात आहे. त्यामुळे ते सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात. मंत्री जारकीहोळी वैचारिक राजकारण करणार्यांपैकी एक आहेत. 2028 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम सुरू केले आहे. ते राजकीय उत्तराधिकारी होतील की नाही माहीत नाही. पण, ते वैचारिक उत्तराधिकारी निश्चितच होऊ शकतात, असेही यतिंद्र यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
राज्यात कोणत्याही प्रकारे नोव्हेंबर क्रांती होणार नाही. नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही. ही केवळ राजकीय चर्चा आहे, असेही डॉ. यतिंद्र यांनी स्पष्ट केले. मंत्री जारकीहोळी म्हणाले, मी 2028 मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करणार आहे. पक्षाने त्यावर निर्णय घ्यावा. यतिंद्र जे बोलले ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे. काकतीमध्ये उभे राहून सर्व काही ठरवणे शक्य नाही. नोव्हेंबरमध्ये होणार्या क्रांतीबद्दल माहिती नाही. सिद्धरामय्या यांच्यानंतर पक्ष चालवण्याबाबत आम्ही प्रतीक्षा करू. पक्षाच्या आमदारांनी नेता कोण असेल हे ठरवावे लागते. आम्ही सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावर पक्षाने निर्णय घ्यावा.
राजकारणात काहीही होवो, मी 2028 मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करेन. माझ्याबद्दल आमदार डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केलेले वक्तव्य हे पूर्णपणे वैयक्तिक आहे, असे मत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि. 23) कित्तूर उत्सवानिमित्त काकतीत चन्नम्मा पुतळा पूजन कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.