

बेळगाव : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची तळागाळापर्यंत योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत राज विभागाने प्रभावीपणे काम केले पाहिजे, महात्मा गांधींचे ग्राम सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार ग्राम प्रशासनावर अधिक भर देत आहे, असे उद्गार जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काढले.
शनिवारी सुवर्णसौधच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित पंचायत राज दिन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेट होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, लोकांसाठी, लोकांकडून चालणारे शासन गावपातळीवर सुरू झाले पाहिजे. ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत या त्रिस्तरीय प्रणालीअंतर्गत गावांच्या विकासासाठी भक्कम पाया घालण्यात आला आहे.
सरकारने तयार केलेले प्रकल्प तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबवले जावेत आणि सरकारचे नाव उज्ज्वल व्हावे, असे आवाहन महिला व बाल विकास, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना केले. कार्यक्रमाला आमदार गणेश हुक्केरी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, राज्य वित्त महामंडळाचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, बाबासाहेब पाटील, जिल्हा पंचायत सीईओ राहूल शिंदे, पोलिस आयुक्त भूषण बोरसेंसह जिल्हास्तरिय अधिकारी उपस्थित होते.