

बेळगाव ःसंतीबस्तवाडमध्ये (ता. बेळगाव) एका धर्मग्रंथाची विटंबना झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग व अन्य पोलिस अधिकार्यांनी संतीबस्तवाडला जाऊन मुस्लिम समाजाच्या पंचांची भेट घेऊन माहिती घेतली.
संतीबस्तवाडमध्ये सध्या प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरु आहे. येथे नमाज पठणासाठी सकाळी मुस्लिम बांधव गेले. यावेळी येथे ठेवलेला धर्मग्रंथ गायब असल्याचे दिसून आले. अज्ञातांनी येथून तो नेऊन प्रार्थनास्थळापासून काही अंतरावर टाकून त्याची विटंबना केल्याचे निदर्शनास आले. यामुळे येथे तातडीने जमाव जमला. असे कृत्य केलेल्या संशयितांचा शोध घेऊन कारवाई करा, अशी मागणी सुरु झाली. याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त मार्बन्यांग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
येथे सर्वत्र सीसीटीव्ही बसवले आहेत. परंतु, विशेष म्हणजे घटनेच्या आधी एकच दिवस दुरुस्तीसाठी ते काढलेले आहेत. ही संधी साधून समाजकंटकांनी येथील धर्मग्रंथाची विटंबना केल्याचा संशय आहे. त्यांना तातडीने ताब्यात घ्या, अशी मागणी मुस्लिम बांधवांनी पोलिस आयुक्तांकडे केली.