Sandur Cave: ‘संडूर गुहा’ ही देशातील सर्वांत जुनी मानवी घाटवस्ती

कार्बन डेटिंगद्वारे शिक्कामोर्तब : बळ्ळारी जिल्ह्यात अश्मयुगीन दगडी हत्यारे, प्राण्यांची हाडे सापडली
Sandur Cave
Sandur Cave
Published on
Updated on

​बळ्ळारी : बळ्ळारी जिल्ह्यातील संडूरच्या जंगलात आढळलेली एक गुहा ही भारतातील वन परिसंस्थेमधील सर्वाधिक उंचीवर असणारी सर्वांत जुनी मानवी वस्ती असल्याचे 'कार्बन डेटिंग' तंत्रज्ञानाद्वारे सिद्ध झाले आहे. ही गुहा अश्मयुगीन काळातील असून, समुद्रसपाटीपासून तब्बल ८५० मीटर उंचीवर स्थित आहे, असा दावा पुरातत्व शास्‍त्रज्ञांनी केला आहे. ही देशातील घाटावरील पहिली मानवी वस्ती असल्याचे मानले जात असून, ती दहा हजार वर्षांपूर्वीची आहे.

प्रसिद्ध पुरातत्व शास्‍त्रज्ञ रवी कोरिशेट्टीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहेत सापडलेल्या मानवी हाडांच्या तुकड्यावर आणि सूक्ष्म पाषाणांवर अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि आयआयटी गांधीनगरच्या आर्केओलॉजी सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन डेटिंग चाचणी करण्यात आली. या चाचणीत ही मानवी वस्ती १० हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​

सामान्यतः भारतातील इतर गुहा या चुनखडीपासून बनलेल्या असतात. मात्र, संडूरच्या जंगलातील गुहा चुनखडीच्या नसून, भूगर्भातील हालचालींमुळे खडक वर उचलले गेल्याने तयार झालेल्या आहेत. 'रशीद पाडी' असे या गुहेचे नाव आहे. २०२४ मध्ये पुरातत्वप्रेमी प्रा. कोरिशेट्टर, पर्यावरणवादी समद कोट्टूर आणि बळ्ळारी हेरिटेज ट्रस्ट तसेच 'रॉबर्ट ब्रूस फूट आर्केओलॉजिकल म्युझियम'च्या सहकाऱ्यांनी हे ठिकाण जगासमोर आणले होते. हे ठिकाण अत्यंत घनदाट जंगलात असल्याने तिथे पोहोचणे आणि संशोधन करणे अत्यंत आव्हानात्मक होते.

या संघाने संडूर परिसरातील रशीद पाडी, देवधारी पाडी, रामा पाडी, भैरव तीर्थपाडी यांसारख्या गुहांचा शोध घेतला आहे. रशीद पाडी या ऐतिहासिक गुहेची उंची तब्बल १०० फूट असून, तिची रुंदी ४५ फूट आहे. या गुहेच्या उत्खननादरम्यान आदिमानवाने वापरलेली शेकडो अश्मयुगीन दगडी हत्यारे आणि प्राचीन प्राण्यांची हाडे सापडली असून, यामुळे या दाव्याला भक्कम पाठबळ मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news