Detention Protest | संविधान पायदळी, मेळावा अटकस्थळी!

कर्नाटकी दडपशाहीला चोख प्रत्युत्तर : म. ए. समिती नेत्यांनी धरपकडीनंतर अटकस्थळी दर्शविला हुंकार!
detention protest
बेळगाव ः व्हॅक्सिन डेपोसमोर आंदोलन करणार्‍या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व महिला कार्यकर्त्यांना उचलून नेताना पोलिस. बेळगाव : मराठी नेत्यांना अटक करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच घेतलेल्या मेळाव्यात बोलताना अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर. समोर मराठी नेते व कार्यकर्ते. Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणार्‍या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवारी मराठी भाषिकांनी आयोजित केलेला महामेळावा कर्नाटकी पोलिसांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न करताना सुमारे 100 नेतेे-कार्यकर्त्यांची धरपकड केली. मात्र, समिती नेत्यांनीही दडपशाहीला प्रत्युत्तर देताना अटकस्थळी म्हणजे एपीएमसीच्या गोदामात मेळावा भरवून मराठी अस्मितेचा हुंकार दर्शवला.

दरम्यान, समिती नेत्यांच्या अटकेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून, कोल्हापुरात कर्नाटकी बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ अशी स्टिकर चिकटत कर्नाटकी प्रशासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सायंकाळी कर्नाटकातही काही कन्नड गुंडांनी महाराष्ट्र बसेसना काळे फासले. परिणामी, दोन्ही राज्यांच्या बससेवा सीमेपर्यंतच धावल्या. अटक केलेल्या मराठी नेत्यांना सायंकाळी जामिनावर मुक्त करण्यात आले.

सोमवारी (दि. 8) व्हॅक्सिन डेपो येथे महामेळावा घेण्याचे समितीने जाहीर केल्यानंतर परिसराचा ताबा पहाटेच पोलिसांनी घेतला. व्हॅक्सिन डेपोकडे जाणारे सारे मार्ग बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले. तरीही डेपोकडे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहरासह संपूर्ण तालुक्यातील नेते व कार्यकर्ते महामेळाव्याकडे मोठ्या संख्येने दाखल होत होते. त्यामुळे घाबरून पोलिसांनी वाटेतच त्यांना अडवून ताब्यात घेतले. काही कार्यकर्ते व्हॅक्सिन डेपोजवळ आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सार्‍यांचेच लक्ष वेधून घेतले होते.

महिलांसह कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

महिला आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ यासह इतर घोषणांनी एपीएमसी परिसर दणाणून गेला होता.

एपीएमसीकडे नेले

टिळकवाडी व्हॅक्सिन डेपोतून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बस आणि इतर वाहनांमधून एपीएमसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथून त्यांना एपीएमसी बाजारपेठेतील एका मोठ्या गोदामात स्थानबद्ध करण्यात आले. मराठी नेत्यांनीही अस्मितेचे दर्शन घडवताना गोदामातच मेळावा भरवत कर्नाटकी सरकारचा निषेध केला. संविधान वाचवा म्हणणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने संविधानाची पायमल्ली करून आपणही संविधान मानत नाही, हेच दाखवून दिल्याची टीका मराठी नेत्यांनी केली.

लोकशाही मार्गाने गेली 69 वर्षे महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मात्र हा लढा दडपून टाकण्यासाठी साम, दाम, दंड यांचा पुरेपूर वापर कर्नाटक सरकार करत आहे. महामेळावा भरवण्यासाठी रीतसर परवानगी मागण्यात आली. मात्र परवानगी नाकारून सोमवारी म.ए समितीच्या नेते व कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली, अशीही टीका नेत्यांनी केली.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

पोलिसांनी मराठी नेत्यांना वाहनांतून एपीएमसीकडे नेले. तेथे एका गोदामात त्यांना स्थानबद्ध केले. त्यानंतर गोदामाभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी अटकेतील नेत्यांना पाणी, खाद्यपदार्थ पुरवले. मोतेश बारदेशकर, मदन बामणे, शेखर पाटील, सुहास हुद्दार यांच्यासह इतर कार्यकर्ते पाणी व इतर साहित्य देण्यासाठी धडपडत होते.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मनोहर किनेकर, रणजित चव्हाण-पाटील, शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, विलास बेळगावकर, प्रकाश शिरोळकर, युवा म. ए.समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, कमल मन्नोळकर, रूपा नावगेकर, अनुराधा सुतार, प्रेमा मोरे, प्रेमा जाधव, शिवानी कदम-पाटील, अ‍ॅड. एम.जी.पाटील, अ‍ॅड अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री, संजय सातेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, डी. बी.पाटील, संजय शिंदे, श्रीधर जाधव, रणजीत पाटील (खानापूर), सचिन केळवेकर, श्रीकांत कदम,

सूरज कुडूचकर, रवळू वड्डेबैलकर(गर्लगुंजी), शंकर पाटील(निडगल), लक्ष्मण पाटील, मरू पाटील, भीमसेन करंबळकर, यल्लापा रेमाणाचे, मनोहर जायणाचे, अरुण अकनोजी, शिवाजी पाटील, सुनील पाटील, कृष्णा मन्नोळकर, संतोष बांडगी, मारुती पाटील, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, दयानंद उघाडे, राकेश परीट, सतीश पाटील, शिवाजी नांदुरकर, नागेश बोबाटे, अंकुश पाटील, अमूल देसाई, अनिल पाटील (किणये), विनायक पाटील, मुकुंद डुकरे(कर्ले), शिवाजी पाटील, धोंडिबा सातेरी देसुरकर, महेश टंकसाळी, रमेश माळवी, शंकर कोणेरी,

सुनील पाटील, राज सांगावकर, रामा यलाप्पा शिंदे, नीरा काकतकर, महादेव बिर्जे, मल्लाप्पा पाटील, मनोहर हुंदरे, आर. के. पाटील, शिवराज पाटील, मोनाप्पा पाटील, नारायण दळवी, शंकर चौगुले, सुहास किल्लेकर, मारुती आंबोळकर, श्रीकांत मांडेकर, सुधीर शिरोळे, उमेश पाटील, सागर सांगावकर, राजू किणयेकर, चेतन पाटील, यलाप्पा पाटील, जोतिबा आंबोळकर, नारायण सांगावकर, नागेश आंबोळकर, राजू दिवटगे, भरमा पाटील, अरुण जाधव, दीपक पाटील, शटूप्पा अमरोळकर, सुनील पाटील, दीपक आंबोळकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दिवसभर स्थानबद्ध केल्यानंतर सगळ्यांची नावे नोंद करून दुपारी साडेतीनच्या दरम्यान नेते-कार्यकर्त्यांची सुटका केली.

मूठभर कन्नड गुंडांचा धुडगूस

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महामेळाव्यासाठी मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनेच्या मूठभर गुंडांनी बेळगाव शहरामध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅक्सिन डेपोपासून दूर नेऊन सोडले. दरम्यान, अथणी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर केवळ पाच-सहा कन्नड गुंडांनी दगडफेक करून बस अडविली. यामुळे सीमा भागातील जनतेतून आणि महाराष्ट्रातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अशा गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

detention protest
Belagaon News | पावसाचा धुमाकूळ; तंबाखू उत्पादकांची तारांबळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news