

बेळगाव : सांबरा येथील विमानतळाचे केवळ विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. परंतु, याठिकाणच्या विमानसेवा कमी होत असून केवळ एका कंपनीवर डोलारा उभा आहे. विमानतळ वाचविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
सांबरा विमानतळावर विमान कंपन्या एकामागून एक आपली सेवा कमी करत आहे. विमानसेवा केवळ एका विमान कंपनीवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक विमानतळ उभारण्यात आले आहे. मात्र, विमानसेवाच उपलब्ध नसेल तर या मोठ्या पायाभूत सुविधांचा उपयोग काय, असा सवाल करण्यात आला आहे.
बेळगाव हे कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक, व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे. यामुळे बेळगावला नियमित हवाई संपर्काची गरज आहे. यामुळे बेळगावहून अधिक विमान कंपन्यांनी सेवा सुरु करावी. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, पुणे यांसह प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा वाढवावी. बेळगावहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत.
विमान कंपन्यांना बेळगावहून सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन व धोरणात्मक मदत द्यावी. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे बेळगावच्या हवाई संपर्कासाठी तातडीची कृती योजना तयार करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
विमानतळाचा विस्तार करण्यात येत आहे. त्याऐवजी अधिकाधिक कंपन्यांची सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. विमानांची अधिक वर्दळ सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
- विजय पाटील, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी