

बेळगाव : अनेक दशकांपासून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न असलेले राम मंदिर हे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे, देणगी चोरीसारखे प्रकार रोखण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भविष्यात काळजी घ्यावी. भक्तांच्या भावना दुखावणारी कोणतीही चूक होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. देणगी चोरीप्रकरणी सध्या सुरू असलेला एसआयटी आणि पोलिस तपास लवकरच तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीची सांगता रविवारी (दि. १२) झाली. येथील संत मीरा शाळेच्या प्रांगणात शुक्रवारपासून (दि. १०) ते रविवारपर्यंत (दि. १२) ही तीन दिवसीय बैठक झाली. सांगता कार्यक्रमानंतर प्रचारप्रमुख आंबेकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चाविषयी माहिती देतानाच राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी चिंता व्यक्त केली.
ते म्हणाले, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दतात्रेय होसबाळे यांच्यासह २२६ प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.
अमली पदार्थांच्या वापराबाबत चिंता
देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक कल्याण यावरही सविस्तर चर्चा झाली. आगामी जनगणना आणि देशातील लोकसंख्येच्या असंतुलनामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आव्हानांवर विचारमंथन झाले. तरुणपिढीतील अमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.