

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचालक मोहन भागवत यांचे सोमवारी सायंकाळी ७ वाजता बेळगावात आगमन झाले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात विमानाने ते बेळगावला पोहोचले. त्यांचे इथे आठवडाभर बेळगावात वास्तव्य राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक बेळगावात १०, ११ आणि १२ जुलै रोजी आयोजित केली आहे. यामध्ये भागवत सहभागी होणार आहेत.
हैदराबाद विमानतळावरून भागवत यांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते. सांबरा येथून ते अनगोळ येथील संत मीरा शाळेकडे रवाना झाले. तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टर अतिथीगृहात करण्यात आली आहे. ते संत मीरा शाळा, फाऊंड्री क्लस्टर व जगन्नाथराव जोशी स्मारक भवन, गुडस् शेड भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बेळगावात होणाऱ्या बैठकीला त्यांच्यासह सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सहसरकार्यवाहक डॉ. कृष्णगोपाळ, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, अशोक कुमार, अतुल लिमये आदींसह अखिल भारतीय कार्यविभागाचे प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य सहभागी होणार आहेत. शिवाय संघटनात्मक रचनेतील ११ क्षेत्र आणि ४६ प्रांतांचे कार्यकर्ते बैठकीला येणार आहेत. त्याचबरोबर संघ परिवारातील ३२ संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री सहभागी होणार आहेत.
मार्च २०२६ मध्ये हरियाणा येथील समाल्वा येथे प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात देशभरात विविध टप्प्यावरील संघ वर्गांचे आयोजन करण्यात आले होते.
वार्षिक कार्ययोजनांची अंमलबजावणी शाखा स्तरावर कशाप्रकारे करता येईल, याबाबत प्रचारक बैठकांमध्ये विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षात शाखा विस्ताराचा आढावा व आगामी काळात करण्यात येणाऱ्या शाखा विस्तारांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरी भागात शाखांचा विस्तार करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने आयटी क्षेत्र आणि उद्योजक, व्यावसायिक क्षेत्रात संघांचे कार्य विस्तारित करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.