

बेळगाव ः शहराला भेडसावणार्या सांडपाणी वाहिनीतील (ड्रेनेज) ब्लॉकेजआणि वाहिनीची परिस्थिती दर्शविणार्या रोबोट प्रणालीचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (दि. 9) महापौरांसमोर सादर करण्यात आले. या प्रणालीच्या वापराबद्दल सर्व नगरसेवकांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत या रोबोटची चाचणी घेण्यात आली. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि जुन्या पाईपलाईनमुळे अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिनी तुंबण्याच्या व गळतीच्या प्रकारांत वाढ होत आहे. त्यामुळे, लोकांना त्रास सहन करावा लागतो. लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीची चाचपणी करण्यात आली.
प्रात्यक्षिकावेळी मशीनच्या क्षमतेबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. हे रोबोट मशीन विशेषतः जुन्या आणि खराब झालेल्या पाईपलाईनमधील नेमका ब्लॉक कुठे आहे, गळती कुठून होत आहे किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये सांडपाणी कुठून मिसळत आहे, हे त्वरित आणि अचूकपणे शोधून काढण्यास सक्षम आहे. अलीकडेच सांगली, मिरज याठिकाणी हे मशीन यशस्वीपणे वापरले जात आहे.
महापौर पवार यांनी मशीनच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला, पण त्याचबरोबर काही तांत्रिक बाबीही स्पष्ट केल्या. शहरात पाणीपुरवठा होणार्या पाईपमध्ये अनेकदा समस्या येतात. पण, हे मशीन प्रामुख्याने रिकाम्या वाहिनीचीच तपासणी करु शकते. त्यामुळे, पाणीपुरवठा पाईपमधील समस्यांसाठी याच्या वापराबाबत अभियंत्यांशी सविस्तर चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती, मुजम्मील डोणी, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक हणमंत कोंगाली आदी उपस्थित होते.
एक रोबोट 27 लाख रुपयांना खरेदी करुन एक महिन्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे. किंवा साडेपाच कोटी रुपये देऊन तीन वर्षांसाठी कंपनीकडूनच ही सेवा घेता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, हे मशीन फक्त समस्या शोधून काढते, त्यामुळे, याच्या वापरामुळे सफाई कामगारांचे काम कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही, हे यावेळी स्पष्ट झाले.