

कारवार : कारवारच्या बेलेकेरी बंदरातून विदेशात बेकायदेशीरपणे लोहखनिज निर्यात केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने कारवारचे काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्यासह अन्य सहा आरोपींना मोठा दिलासा दिला आहे. बेंगलोरच्या विशेष लोकप्रतिनिधीच्या न्यायालयाने दिलेल्या सात वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
बेंगलोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या नेतृत्वाखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. शिवाय, उच्च न्यायालयाने आरोपींना दंडाच्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम न्यायालयात जमा करण्याची अट घातली आहे , त्यांना ही रक्कम जमा करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत देत शिक्षेला स्थगिती दिली. उद्या १४ तारखेला सातही आरोपींची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.
बेंगलोरच्या विशेष लोकप्रतिनिधिंच्या न्यायालयाने बेलेकेरी बंदरातून बेकायदेशीर विदेशात खनिज निर्यात केल्याचा ठपका ठेवत कारवारचे आमदार सतीश सैल यांच्यासह सात जणांना दोषी ठरवत विविध सहा प्रकरणात सुमारे ४४ कोटी रुपये दंड आणि ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी या सातही आरोपीना अटक करून तुरुंगात पाठवले होते. मात्र त्यानंतर सैल यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.