

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक बाँडप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माजी खासदार नलीनकुमार कटील यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत दाखल एफआयआर उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
लोकसभा निवडणूक काळात भाजपने निवडणूक बाँडच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. याविरुद्ध बंगळूर पोलिसांत खासगी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तिघांवरही एफआयआर दाखल झाला होता. या तिघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्येष्ठ वकील अॅड. के. जी. राघवन यांनी त्यांच्यातर्फे युक्तिवाद केला. सदर तक्रार राजकीयप्ररित असून, एफआयआर रद्द करण्याची विनंती त्यांनी केली.
तक्रारदारातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी संबंधितांविरुद्ध सक्तीने कारवाई करू नये, अशी सूचना दिली होती आणि निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला.