

बेळगाव : भुतरामहट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठात (आरसीयू) ३२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा काकती पोलिसांत नोंद झाला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी भविष्य निर्वाह निधी व पेन्शनची रक्कम बेकायदेशीररीत्या स्वतःच्या नावे वर्ग करून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते २०२३ यादरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
संशयितांमध्ये मुरुगेश एच. एम., महेश वीरेश वाली, रामू यमनाप्पा हंचीनाळ व संदीप बुर्ली (सर्वजण रा. चन्नम्मा विद्यापीठ) यांचा समावेश आहे. यासंबंधी विद्यापीठाचे डॉ. दरीखान कृष्णदेव कांबळे (वय ४७) यांनी यासंबंधी काकती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपरोक्त चौघेही संशयित चन्नम्मा विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच पेन्शन रकमेसंबंधीचे आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी व पेन्शनची रक्कम त्यांना देय होती. ती रक्कम या संशयितांनी स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. ही रक्कम ३२ लाख १ हजार ५४६ असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार या चौघा संशयितांनी संगनमताने केला असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर विश्वासघात व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरसीयूसारख्या विद्यापीठातच असा गोलमाल झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काकती पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.