

बेळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. अनेक गल्ल्या व गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. अशा काळासाठीच एक वरदान म्हणून येथील प्यास फाउंडेशन गत अनेक वर्षांपासून काम करत आहे. या फाउंडेशनच्या पुढाकारातून खासबागमधील टीचर्स कॉलनीतील एक विहीरपुनर्जीवित करण्यात आली असून तिचे लोकार्पण सोमवारी (दि. 28) सायंकाळी पाच वाजता होत आहे. पाणी टंचाईच्या काळात परिसरातील रहिवाशांसाठी ही विहीर उपकारक ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्यास फाउंडेशनकडून तलाव व विहिरींचे पुनरुज्जीवन सुरु आहे. शहर उपनगरातील तीन विहिरी आतापर्यंत पुनर्जीवित केल्या आहेत. खासबागमधील विहीर पुनर्जीवित केलेली चौथी विहीर ठरली आहे.
यापूर्वी फाउंडेशनने शहर उपनगर व जिल्ह्यातील एकूण 14 तलाव पुनर्जीवित केले आहेत. या सर्व तलावांमुळे स्थानिक रहिवाशांना रोज लाखो लिटर्स पाण्याचा वापर करता येत आहे. मुक्या जनावरांचा प्रश्न सुटला आहे. काही ठिकाणी पशुपक्षी व वन्यप्राण्यांनाही या तलावांचा वापर करता येऊ लागला आहे.
खासबागमधील विहीर पुनर्जीवित करण्यासाठी एकेपी फाउंड्री व बेमको इंडस्ट्रीजकडून सीएसआर निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी एकेपी फाउंड्रीचे राम भंडारे, पराग भंडारे व बेमको इंडस्ट्रीजचे अनिरुद्ध मोहता यांचे सहकार्य लाभले आहे.
प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, उपाध्यक्ष अभिमन्यू डागा, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, सचिव प्रीती कोरे, संचालक दीपक ओऊळकर, रोहन कुलकर्णी, अवधूत सामंत, सतीश लाड यांच्याकडून तलाव व विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरु आहे. खासबागमधील प्रकल्पासाठी सूर्यकांत हिंडलकर यांनी समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.
शहरात 70 हून अधिक विहिरी बुजलेल्या स्थितीत आहेत. आम्ही या पुढील काळातही विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत जिल्ह्यात 14 तलावांचे व शहर उपनगरातील 4 विहिरी पुनर्जीवित केल्या आहेत. या चळवळीत लोकांनी उस्फूर्तपणे सहभाग वाढवावा, हीच आमची अपेक्षा आहे.
डॉ. माधव प्रभू, अध्यक्ष, प्यास फाउंडेशन