बंगळूर : अंतर्गत कलह, वैयक्तिक प्रतिष्ठा आणि स्वार्थ बाजूला ठेवून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि सिद्धरामय्या सरकारविरुद्ध संघटितपणे लढा दिला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कर्नाटक भाजप नेत्यांची कानउघाडणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध सक्रिय झालेल्या नाराजांनाही शांत राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्य भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक बंगळूर येथे पार पडली. यावेळी संघाकडून बी. एल. संतोष, मुकुंद, सुधीर, नागराजू, तिप्पेस्वामी यांच्यासह भाजपचे प्रभारी डॉ. राधामोहन अग्रवाल, प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह सुमारे ४० नेते उपस्थित होते. चन्नेहळ्ळी येथील आरएसएस कार्यालयात सकाळपासून सुरू झालेली ही बैठक दुपारपर्यंत सुरू होती.
सभेत नेत्यांमधील अंतर्गत वैयक्तिक प्रतिष्ठा आणि तडजोडीच्या राजकारणाचा मुद्दा संघाच्या नेत्यांनी प्रामुख्याने चर्चेला आणला. प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र हे काही निर्णय एकतर्फी घेत आहेत, पदाधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेत नाहीत, नेत्यांशी चर्चा करत नाहीत, याचा विशेष उल्लेख करून नेत्यांनी यापुढे असे मतभेद होऊ देऊ नयेत, अशी सूचना केली. नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने म्हैसूर पदयात्रेला अपेक्षित यश मिळू शकले नाही, त्यामुळे यापुढे कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित करावे, अशी सूचनाही भाजप नेत्यांना करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सत्ताधारी काँग्रेस सरकार अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्य हिंदूंच्या मतासाठी प्रयत्न करण्यात व्यस्त आहे. हे अनुसूचित जाती-जमातीविरोधी सरकार असून भाजपची सदस्यत्व मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार चलवादी नारायणस्वामी, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी खासदार प्रताप सिम्हा, अरविंद लिंबावळी, सी. टी. रवी, व्ही. सुनील कुमार, अरविंद बेल्लद आदी उपस्थित होते.