खानापूर : मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित असलेल्या वेश्याव्यवसायाने खानापूर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत शहरातही बस्तान बसवल्याचे उघडकीस आले आहे. शहरांतर्गत बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँकेसमोरील आमंत्रण लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी लॉज मालक विनायक लक्ष्मण मांजरेकर याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून लॉजच्या नावाखाली या ठिकाणी अवैध वेश्याव्यवसायाचा खेळ मांडण्यात आला होता. अलीकडच्या काळात उघडपणे महिला व युवतींचा पुरवठा करून स्थानिक युवकांना गैरमार्गाला लावण्याचा मोठा धंदा लॉज मालकाने चालवला होता. यासाठी लॉजच्या पाठीमागून ग्राहकांना चोरीछुपे प्रवेश दिला जात होता. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आज पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी बेळगाव आणि तालुका बाहेरून आणलेल्या पाच महिलांची सुटका करण्यात आली. तसेच ग्राहक म्हणून आलेल्या अकरा जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेण्यात आले.
एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मंजुनाथ नायक, गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय चन्नबसव बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मन्नावर, अनुसया बसप्पानवर, ओंकारा वाढवे, मंजुनाथ मुसळी, वासुदेव पारसेकर, ईश्वर जिन्नापगोळ आदींनी या छाप्यात सहभाग घेतला. महिलांना सुधार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.