

निपाणी : बेळगाव–धारवाड महामार्गावर एम.के. हुबळी नजीक साखर कारखान्यासमोर कारची झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात निपाणी येथील व्ही.एस.एम. संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक एस. एम. चंद्रकांत (वय ४१, रा. शिमोगा) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी घडला असून, याबाबतची नोंद कित्तूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस. एम. चंद्रकांत हे मूळचे शिमोगा येथील रहिवासी असून, ते गेल्या पाच वर्षांपासून निपाणी येथील व्हीएसएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी धारवाड येथे पीएचडीचे शिक्षण घेत असल्याने त्या सध्या चंद्रकांत यांच्या आई-वडील व दोन मुलांसह धारवाड येथे राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने चंद्रकांत हे दुपारी सुमारे १२ वाजता आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी कारने धारवाडकडे निघाले होते.
एम.के. हुबळी नजीक साखर कारखान्यासमोर त्यांच्या कारसमोर अचानक एक वाहन आल्याने ते वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी ब्रेक दाबला. त्यामुळे वेगात असलेली कार नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कित्तूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ आणि सीपीआय शिवानंद यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृताची ओळख पटवून कुटुंबियांना माहिती दिली. चंद्रकांत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
प्रा. चंद्रकांत हे मनमिळाऊ व हळव्या स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अल्पावधीतच सहकारी व विद्यार्थ्यांमध्ये आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे व्हीएसएम संस्थेसह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर रात्री मूळ गावी शिमोगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ करीत आहेत.