

निपाणी : सरकारी महात्मा गांधी रुग्णालयासह माता-शिशू केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही यासाठी आवश्यक सहकार्य व वैद्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. खासदार फंडातून सरकारी महात्मा गांधी रुग्णालय व माता-शिशू केंद्रासाठी मंजूर झालेल्या स्वच्छता यंत्र लोकार्पण कार्यक्रमात शुक्रवारी त्या बोलत होत्या.
रुग्णालयाचे सहायक वैद्य अधिकारी संतोष गाणगेर यांनी स्वागत केले. खासदार म्हणाल्या, निपाणीतील सरकारी महात्मा गांधी रुग्णालय व शिशू केंद्र तालुका केंद्र म्हणून परिचित आहे. याठिकाणी निपाणीसह सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे ठिकाणी कायमस्वरूपी रुग्ण व नातेवाईकांची वर्दळ असते. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच रुग्णांना अधिकाधिक उपचार मिळावे, यासाठी राज्य सरकार अनेक योजना व सवलती उपलब्ध करून देत आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा.
चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केेले. खासदार जारकीहोळी व चिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील, वर्षा चव्हाण, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, युवानेते पंकज पाटील, सुजय पाटील, माजी जि. पं. सदस्य राजेंद्र वडर, सुमित्रा उगळे, प्रतीक शहा, डॉ. ईश्वर पत्तार, प्रणव देशपांडे आदी उपस्थित होते. या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या महिला व नागरिकांनी रुग्णालयात प्रसुतीतज्ज्ञ तसेच इतर आजारांवरील तज्ज्ञ वैद्याधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करावी अशी मागणी केली.