

बेळगाव : बेळगावचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्रकाश अमृत निकम यांची नियुक्ती झाली असून पुढील दोन दिवसांत ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागाचे अवर सचिव संजय बी. एस. राज्यातील १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश शनिवारी सायंकाळी बजावला. यामध्ये प्रकाश निकम हे बेळगावचे आयुक्त तर भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाडचे आयुक्त म्हणून बदलीचा उल्लेख आहे.
आयुक्त बोरसे यांची मे २०२५ मध्ये बेळगावचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या बदलीनंतर बेळगावात आल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षातच त्यांची बदली झाल्याने बेळगावकरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण, कार्यतत्पर, प्रामाणिक आणि मितभाषी अधिकारी म्हणून त्यांनी सव्वा वर्षातच बेळगावात आपल्या कामाची छाप उमटवली होती.
सतत कामाात गुंतवून घेणारे अधिकारी अशी त्यांची पोलिस वर्तुळात छबी होती. बेळगावच्या विकासासाठी आणि एकूण कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या हातून होण्यासारखी बेळगावची अनेक कामे अपूर्ण असताना त्यांची अचानक बदली ही बेळगावकरांच्याही पचनी पडलेली नाही.
निकम यांना बेळगावची ओळख
कर्नाटक केडरचे सन २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले प्रकाश निकम हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी बेळगावला एएसपी म्हणून काही महिने सेवा बजावली आहे. त्यामुळे बेळगावच्या भौगोलिक स्थितीबद्दल त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. याचा फायदा त्यांना येथील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी निश्चितच होणार आहे. पुढील दोन दिवसात ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.