

Soundatti police kills wife
बेळगाव : कंडक्टर पत्नीने सततच्या संशयामुळे आधी विभक्त राहून पतीकडून घटस्फोट घेतला. परंतु, अकरा वर्षाचा मुलगा माझ्या ताब्यात हवा म्हणून पती सातत्याने भांडण काढत होता. बदली करून गेलेल्या गावी जाऊन भांडण काढत त्याने पत्नीचा निर्घृण खून केला. काशव्वा संतोष करीकट्टी (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे.
पाच दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील रामापूर साईट येथे घडलेल्या खुनाची सौंदत्ती पोलिसांत नोंद झाली असून पोलीस कॉन्स्टेबल पतीला अटक केली आहे. विशेष म्हणजे या दांपत्याचा बारा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता.
पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे व काशव्वा करीकट्टी यांची बारा वर्षांपूर्वी एकमेकांशी ओळख होऊन प्रेमविवाह झाला. यानंतर त्यांना मुलगा होऊन तो सध्या अकरा वर्षाचा आहे. काशव्वा या एसटी महामंडळात कंडक्टर होत्या तर संतोष हा निपाणी येथील ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून संतोष हा काशव्वावर संशय घेत असल्याने दोघांची सातत्याने भांडण सुरू होती. सततच्या भांडणाला कंटाळून काशव्वाने आपली बदली सौंदत्ती डेपोमध्ये करून घेतली होती. याच काळात तिने बैलहोंगल न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. एप्रील 2025 मध्ये न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे.
घटस्फोटानंतरही संपर्कात
न्यायालयामार्फत घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर संतोष हा अकरा वर्षाच्या मुलाचा ताबा मागत होता. या काळात घटस्फोट झाला तरीही दोघे संपर्कात होते. यासंबंधी पंचमंडळींच्या समक्ष मुलाला विचारणा केली असता तो आईकडे राहणार असल्याचे म्हटल्याने सध्या तो काशव्वा यांच्याकडेच राहात होता. यामुळे संतोषला राग होता. तो काशव्वा राहात असलेल्या सौंदत्ती तालुक्यातील रामापूर साईट येथे जाऊन पुन्हा भांडण काढत होता. 13 रोजी त्याने मुलाचा ताबा मागत पुन्हा भांडण काढले. रागाच्या भरात त्याने काशव्वा यांना चाकूने भोसकले व घराला कुलूप लावून तो फरारी झाला. काशव्वा या नोकरीला न गेल्याने तिच्या सहकार्याने घरी जाऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सौंदत्ती ठाण्याचे निरीक्षक धर्माकर धर्मट्टी यांनी तपास करून दोन दिवसांपूर्वी संतोषला अटक केली.