

बेळगाव : मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणारे व रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावून शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. गेल्या अडीच महिन्यांत बेकायदेशीर ध्वनिक्षेपक लावणाऱ्या ३९ जणांवर तर १०१ मद्यपी अशा १४० जणांवर कारवाई केल्याची आकडेवारीही आयुक्तालयाने जाहीर केली आहे.
रात्रीच्यावेळी सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश डीजे लावून धिंगाणा घालणाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तुमच्या भागात सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्यास त्याबाबतची तक्रार ११२ या क्रमांकावर करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या अडीच महिन्यांत अनेकांनी तक्रार केली होती.
रात्रीच्यावेळी डीजे लावून सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या १३९ जणांवर कारवाई केली आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्या १०१ जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे भविष्यातही अशी कारवाई सुरू राहणार असून कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
त्रास होतोय, तक्रार करा
शहरातील अनेक भागात अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान करत बसणारे दिसून येतात. त्यांचा येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना, तरुणींना व शाळकरी मुलांनाही त्रास होतो. असा प्रकार कुठे आढळून आल्यास याबाबत तसेच तुमच्या परिसरात मोठ्याने डाॅल्बी लावून धिंगाणा घातला जात असल्यास याची ११२ या क्रमांकावर तक्रार करा. तुमचे नाव गुपीत ठेवून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आवाहनही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.