

बेळगाव : बेळगाव ते मिरज व मिरज ते बेळगाव पॅसेंचर रेल्वेचा तिकीट दर ८० रुपये आहे. एक्स्प्रेस रेल्वेला बेळगाव ते मिरज तिकीट दर ६५ रुपये आहे. पॅसेंजरच्या तुलनेत १५ रुपयाचा फरक आहे. पॅसेंजर रेल्वेचा तिकीट दर कमी करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
बेळगाव ते मिरज व मिरज ते बेळगाव पॅसेंजर रेल्वेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी रेल्वेसेवा एक्स्प्रेस रेल्वेच्या तुलनेत महाग झाली आहे. एक्स्प्रेस रेल्वेला जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी मिरज ते बेळगाव केवळ ६५ रुपये तिकीट आहे. तर खास मिरज ते बेळगाव व बेळगाव ते मिरज सुरु केलेल्या पॅसेंजर तिकीट महागले आहे. यापूर्वी बेळगाव ते मिरज ३० रुपये होते. यामध्ये दुप्पट वाढ करुन ते ६० रुपये करण्यात आले.
कोरोना काळात पॅसेंजर रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. २०२१ मध्ये पॅसेंजर रेल्वे काही काळासाठी धावण्यास सुरुवात झाली. मात्र तिकिटाच्या दरात वाढ करुन बेळगाव ते मिरज प्रवास ८० रुपये करण्यात आला. राणी चन्नमा रेल्वे वगळता इतर एक्स्प्रेसना जनरल डब्यातून प्रवास केल्यास तिकीट दर महाग आहे. त्यासाठी पॅसेंजर रेल्वेचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.