

Pahalgam Terror Attack
बेळगाव : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. केंद्र सरकार जे पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देणे हा आमचा द़ृष्टिकोन आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
येळ्ळूरमध्ये शनिवारी (दि. 26) होणार्या मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमासाठी खासदार पवार शुक्रवारी (दि. 25) बेळगावात दाखल झाले आहेत. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा पर्यटकांवर नव्हे तर देशावर झालेला हल्ला आहे. या पद्धतीने जेव्हा देशावर हल्ला होतो, त्यावेळी आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की राजकारण बाजूला सारुन कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार पाठिंबा देणे. केंद्र सरकार जे पाऊल उचलेल त्याला साथ देणे. आमचा द़ृष्टिकोन तसाच असेल. यासंदर्भात गुरुवारी (दि. 24) सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत सर्वानुमते पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आपण राजकारण आणायचे नाही असे ठरले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही तडजोड न करता कठोर पावले उचलली पाहिजेत. त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. आता बघुया पुढे काय होतं? असे खासदार पवार म्हणाले.
खासदार पवार यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, डॉ. कोरे यांच्या पत्नी आशाताई कोरे व इतर उपस्थित होते. दोघेही नेते शनिवारी होणार्या कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत.