

बंगळूर : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या घटनेची पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहेत. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानबरोबर युद्धाची गरज नसून काश्मीरमध्ये बंदोबस्त वाढवावा, असे वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर येथे शनिवारी (दि. 26) केले. त्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली जात आहे.
राज्यातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी दहशतवाद्यांच्या कृत्याचे भांडवल भाजपकडून राजकीय फायद्यासाठी केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची गरज नसून काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात यावी. आम्ही कधीही युद्धाचे समर्थन करत नसून शांती कायम ठेवण्यासाठी केंद्राने बंदोबस्तात वाढ करावी, असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोदी जनतेला टोपी घालण्याचे काम करत आहेत, असे म्हटले आहे. हे वक्तव्य भाजप नेत्यांना झोंबले आहे. यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ला हा सुरक्षेतील कमतरता असल्याचे केंद्राने मान्य केले आहे. मागे पुलवामा येथे 40 जवानांना जीव गमवावा लागला. त्यावेळीही सुरक्षेतील कमतरता कारणीभूत होती.
अधिक संख्येने पर्यटक भेट देणार्या ठिकाणी अधिक सुरक्षा ठेवणे आवश्यक होते. केंद्रावर विश्वास ठेवून पर्यटक काश्मीर पर्यटनाला येत आहेत. आता कोणतीही उपाययोजना केली तरी दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले 25 जीव परत येणे शक्य आहे काय?
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणे आवश्यक हाते. परंतु, त्यांना बिहारच्या निवडणुकीचा प्रचार महत्त्वाचा वाटत आहे. जनतेला टोपी घालण्याचा उद्योग सुरू आहे.