

बेळगाव : मागील महिनाभरापासून सुरू असणार्या पावसाने शिवारे जलमय झाली आहे. येळ्ळूर, वडगाव, शहापूर शिवारात पावसाचे पाणी साचून राहिले आहे. अनेक दिवसांपासून पाण्याची पातळी कमी होत नसल्याने भात पीक कुजून जात आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत आहे.
येळ्ळूर शिवारात बासमती पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बासमती पिकांसाठी हा शिवार उत्कृष्ट समजला जातो. परंतु, यंदा संततधार पावसाचा फटका शेतकर्यांना बसला आहे. शिवारांतून महिनाभरापासून पावसाचे पाणी साचून राहिले आहे. परिणामी उगवण झालेले भात पीक कुजून जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बेळगाव शहरासह शहापूर, वडगाव, अनगोळ, येळ्ळूर शिवार सुपीक समजला जातो. याठिकाणी भाताचे चांगले उत्पादन मिळते. परंतु, बहुतांश शिवाराला बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा फटका बसतो. बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येतो. परिणामी शिवारातून पावसाचे पाणी अनेक दिवस साचून राहते. त्याचबरोबर सध्या सुरू असणार्या हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामांने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी शिवारातील भात पीक कुजून जात आहे. शेतकरी अडचणीत सापडत आहे.
शेतकर्यांनी दुबार भात पेरणी केली आहे. या पिकाची उगवण झाली. परंतु, पावसाचा मध्यंतरी जोर वाढल्याने शिवारातून पावसाचे पाणी साचून राहिले. यामुळे उगवण झालेली पिके कुजू लागली आहेत. शेतकर्यांना तिसर्यांदा पेरणी करावी लागणार आहे.