

जमखंडी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष मतदार यादी सुधारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जमखंडी विधानसभा मतदारसंघातील ३६ हजार ७३९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी श्वेता बेडीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
वगळण्यात आलेल्या ३६ हजार ७३९ मतदारांमध्ये २ हजार ५३३ अनुपस्थित मतदार, २४ हजार २७८ विस्थापित मतदार, ७ हजार ५४२ मृत मतदार, २ हजार २४४ बनावट मतदार आणि १४ इतर मतदारांचा समावेश आहे. जमखंडी मतदारसंघात पूर्वी २ लाख ३० हजार ६ मतदार होते. सर्व मतदारांची ओळख पटवून त्यांना अर्ज देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ९३ हजार २६७ मतदारांचे भरलेले अर्ज परत मिळाले असून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.
मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. २४ पासून बीएलओ आणि राजकीय पक्षांना मतदार यादी वितरित करण्याचे काम सुरू आहे. मतदारांनी यादीतील आपले नाव, वय आणि पत्ता अचूक असल्याची खात्री करावी. आक्षेप नोंदवण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
सध्या मतदारसंघात एकूण १ लाख ९३ हजार २६७ मतदार असून त्यामध्ये ९६ हजार ५८६ पुरुष, ९६ हजार ६७३ महिला आणि 8 इतर मतदारांचा समावेश आहे. विसंगती असलेल्या आणि यादीत समाविष्ट नसलेल्या मतदारांचे अर्ज तपासल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ज्यांचे अर्ज जुळत नाहीत, असे १ हजार २२१ मतदार आणि २००२ च्या मतदार यादीत ज्यांची कोणतीही नोंद नाही, असे ६०१ मतदारांची चौकशी करण्यात येणार आहे. योग्य कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्र मतदारांना मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. मतदारसंघात पूर्वी २३२ मतदान केंद्रे होती. त्यात २१ मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली असून आता एकूण २५३ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत, असे सांगितले. यावेळी तहसीलदार अनिल बडिगेर उपस्थित होते.
सप्टेंबरपासून दर शनिवारी जनसेवा आंदोलन
राज्य सरकारच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यापासून प्रत्येक शनिवारी जनसेवा आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आंदोलनात नागरिकांना समस्या व तक्रारी मांडता येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी आमदार जगदीश गुडगुंटी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गुरुदेव रानडे भवन, पी. बी. हायस्कूल येथे जनसेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर रोजी सावळगी येथील माळी सभा भवन, १९ सप्टेंबर रोजी मरेगुद्दी येथील ग्रामपंचायत सभा भवन आणि २६ सप्टेंबर रोजी गोठे येथील डॉ. आंबेडकर सभा भवन येथे जनसेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.