

बेळगाव : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून शहरातील जाधवनगरमधील एका डॉक्टरची तब्बल ८४ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरने सोमवारी (दि. १३) शहर सीईएन पोलिसात फिर्याद दाखल केली. ही फसवणूक जानेवारी ते मार्च दरम्यान झाली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, टीव्ही सेंटर जाधवनगर येथील डॉ. जगदीश यांना १२ डिसेंबर २०२५ रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर काही वेळातच संबंधित भामट्याने डॉक्टरना बुल्स जर्नी नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. न्याव्हिया स्टॉक्स या बनावट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा असल्याचे भासवत डॉक्टरांना वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. भामट्यांनी दिलेल्या सूचनेनुसार डॉक्टरांनी १८ जानेवारी ते १० मार्च या दरम्यान संबंधित भामट्यांना वेळोवेळी रक्कम पाठवली. भामट्यांनी दिलेल्या तब्बल चार मोबाईल क्रमांकावर त्यांनी एसबीआय व आयसीआयसीआय बँकेतील आपल्या खात्यावरून ही रक्कम वर्ग केली आहे. टप्प्याटप्प्याने पाठवलेली ही रक्कम ८४ लाख ४६ हजार ८१३ रुपये असल्याचे आढळून आले आहे.
इतकी मोठी रक्कम गुंतवूणही सहा महिन्यानंतर खात्यावर काहीच रक्कम जमा न झाल्याने आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी डॉक्टरांनी शहर सीईएन पोलिस ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून, पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.
कशी झाली फसवणूक
डॉ. जगदीश यांनी सुरुवातीला थोडी रक्कम गुंतविल्यानंतर नॅव्हिया ॲपमध्ये त्यांच्या नावे त्या गुंतवणुकीचा परतावा जमा झाल्याचा संदेश देण्यात आला. काही दिवसांनी डॉक्टरांनी हा परतावा बँकेतून काढूनही घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा मोठी रक्कम गुंतविली. या मोठ्या रकमेचा परतावाही त्यांना त्यांच्या खात्यावर जमा झालेला दिसला. ते पैसेही त्यांनी बँकेतून काढून घेतले. त्यामुळे डॉक्टरांचा या ऑनलाईन भामट्यांवर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी आणखी मोठी रक्कम गुंतविली. यावेळी मात्र भामट्यांनी त्यांच्या खात्यावर त्याचा परतावा जमा केल्याचा दिखावा केला. मात्र, डॉक्टरांना खात्यावरून पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर ते ॲपही निष्क्रीय झाले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली.