

बेळगाव ः वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने आता आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे नामांतर राणी चन्नम्मा परिवहन महामंडळ करण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव हुबळीतील मुख्यालयातून राज्य सरकारला पाठवला आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
हुबळीत मुख्यालय असलेल्या वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने काही वर्षांपूर्वी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे नाव बदलून वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ असे केले होते. राज्यातील पाच विभागांचे दिशांवरुन नामांतर करण्यात आले होते. आता पुन्हा नामांतराचा घाट घालण्यात आला आहे.
मध्यंतरी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे कल्याण कर्नाटक किंवा कित्तूर कर्नाटक परिवहन महामंडळ असे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण, गुलबर्गा येथील परिवहन महामंडळाने कल्याण कर्नाटक परिवहन महामंडळ असे नामांतर करुन घेतले. त्याचे संक्षिप्त स्वरुप कित्तूर कर्नाटक परिवहन महामंडळाशी जुळत असल्याने नामांतराचा प्रस्ताव सरकारने नाकारला होता. आता नावात बदल करून राणी चन्नम्मा परिवहन महामंडळ म्हणजेच आरसीटीसी असे करण्यात यावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकात वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या हुबळी कार्यालयातून बेळगाव जिल्ह्यासह हुबळी, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी आणि कारवार या जिल्ह्यांना सेवा पुरवण्यात येते. या मंडळाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. बेळगाव जिल्ह्यात राणी चन्नम्मांचे राज्य होते. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच जिल्ह्यात झाला. त्यामुळे, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे नामांतर आता राणी चन्नम्मा परिवहन महामंडळ असे करावे, अशी मागणी लोकांनी केली होती. त्याची दखल घेत हुबळीतील कार्यालयाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.
हुबळीतील वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालिका प्रियांगा एम. यांनी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासमोर नामांतराचा प्रस्ताव मांडला आहे. तो आता राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेला येऊन नामांतराबाबत निर्णय होणार आहे. याबाबत उत्तर कर्नाटकात उत्सुकता आहे.