.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बंगळूर : महर्षी वाल्मीकी विकास महामंडळातील घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. तरीही विरोधी पक्षातील नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत; पण मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सोमवारी (दि. 22) विधान परिषदेत दिले.
नियम 68 अंतर्गत त्यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी दीर्घ उत्तर दिले. विरोधी नेत्यांनी वाल्मीकी विकास महामंडळाचा घोटाळा पुढे करून माझ्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात माझा कुठेही संबंध नाही, तरीही ते माझ्याकडे उत्तर मागत असल्याने आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या उत्तरामुळे भाजप सदस्य संतप्त झाले. या प्रकरणातून सुटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून सत्तारूढ आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
सी. टी. रवी यांनी घोटाळा झाला हे खोटे आहे का? मंत्री बी. नागेंद्र यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हेही खोटे आहे का? आमदार बसनगौडा दद्दल यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली नाही का? असे प्रश्न विचारले. एन. रविकुमार यांनी त्यांना साथ दिली. घोटाळा झालाच नसल्याची खोटी माहिती मुख्यमंत्री सभागृहाला देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतप्त झाले. प्रकरणाचा तपास केला जात आहे. माझ्याविरुद्ध भाजपने षड्यंत्र रचले आहे. घोटाळा झाला नाही असे म्हटले नाही. दोषी ठरलेल्यांना शिक्षा होणारच. प्रकरणात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीचे रक्षण करणार नाही. पण, भाजपकडून खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शंभरवेळा खोटे विधान करुन ते खरेच असल्याचे भासवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
त्यांच्या या विधानाने गदारोळ झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर देत असताना विरोधकांकडून आडकाठी आणण्यात येत असल्याने त्यांना सभागृहातून हाकलण्यात यावे, अशी विनंती सत्तारूढ सदस्यांनी केली. या विनंतीवरुन पुन्हा गदारोळ झाला. अखेर सभापती बसवराज होरट्टी यांनी त्यांच्या जागेवर उभे राहून विरोधकांना विनंती केली. त्यानुसार विरोधक आपल्या जागेवर शांतपणे बसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बोलण्यास सुरवात केली.