Nipani Weather: पावसाची उघडझाप, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला आजपासून प्रारंभ; ३० ते ४० टक्के क्षेत्रातील सोयाबीन काढणीला
Nipani Weather: पावसाची उघडझाप, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
Published on
Updated on

निपाणी : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगाम लांबला आणि त्यानंतर सततच्या पावसाची उघडझाप सुरू राहिल्याने पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.पावसाळी हंगामातील सहा नक्षत्रे संपली असून, पूर्वा फाल्गुनी अर्थात ‘सुना’ नक्षत्राला रविवार दि. ३० पासून प्रारंभ होत आहे.या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. सध्याच्या परिस्थितीत पिकांना उघडीप मिळणे अधिक गरजेचे आहे. मघा अर्थात ‘सासू’ नक्षत्रात तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात आतापर्यंत सुमारे ५०० मि.मी.पाऊस झाला असून, काही दिवसांपूर्वी दोन्ही नद्यांना महापूर आला होता.

निपाणी परिसरात यंदा सुमारे दोन हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. आगाऊ पेरणी झालेल्या ३० ते ४० टक्के क्षेत्रातील सोयाबीन काढणीस आले आहे. मात्र, पावसामुळे काढणी आणि मळणीची कामे खोळंबली आहेत. उशिरा पेरणी झालेले सोयाबीन फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, सततच्या पावसामुळे करपा, तांबेरा तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.

शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पिकांची वाढ चांगली असली तरी सततच्या उघडझापीमुळे रोपांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे काही दिवस पावसाची उघडीप मिळाल्यास पिकांना फायदा होणार आहे. पावसामुळे सोयाबीनची काढणी केलेले पीक वाळवणे आणि मळणी करणे कठीण झाले आहे. ओलसर काडीमुळे मशिनद्वारे मळणी करताना अडचणी येत असून, सोयाबीन मशिनमध्ये अडकण्याचे प्रकार होत आहेत. यंदा एकरी केवळ ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

उशिरा सुरू झालेला खरीप आणि सततचा पाऊस यामुळे रब्बीच्या नियोजनावरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पूर्वमशागत झालेली नाही. त्यामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. आता पूर्वा फाल्गुनी ‘सुना’ नक्षत्र सुरू झाले असून, ‘सासूची वाट सुना मळवणार का?’ याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र, यावेळी बळीराजाची अपेक्षा पिके सावरण्यासाठी पावसाची नव्हे, तर चांगल्या उघडिपीची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news