Belgaum News| काम अपूर्ण, मात्र उद्‍घाटन सोहळा थाटात

निपाणीमधील इंदिरा कॅन्टीनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट असतानाच ऑनलाईन उद्‍घाटन
Belgaum News
निपाणीमधील इंदिरा कॅन्टीनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट असतानाच ऑनलाईन उद्‍घाटन
Published on: 
Updated on: 

निपाणी : सर्वसामान्यांना स्वस्त दरात नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येणाऱ्या निपाणीतील इंदिरा कॅन्टीनची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाही गुरुवारी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, उद्‌घाटनासाठी इमारतीची रंगरंगोटी करून मंडप उभारण्यात आला; मात्र कार्यक्रम संपल्यानंतर अवघ्या तासाभरात मंडप हटविण्यात आल्याने इमारतीचे अपूर्ण स्वरूप पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष कॅन्टीन सुरू करण्यापेक्षा उद्‌घाटनालाच प्राधान्य दिले जात आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यातील विविध ठिकाणच्या इंदिरा कॅन्टीनचे एकाचवेळी ऑनलाइन उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार निपाणी बसस्थानक आवारातील कॅन्टीनच्या अपूर्ण इमारतीतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, प्रत्यक्षात इमारतीचे काम पूर्ण झालेले नसल्याने कॅन्टीन सुरू होण्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

या प्रकल्पाचा प्रवासही अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे. सुरुवातीला नगरपालिकेजवळील लोकमान्य टिळक उद्यान परिसरात कॅन्टीन उभारण्याचे नियोजन होते. मात्र, नगरसेवक, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्याने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. त्यानंतर बसस्थानक परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. जागा हस्तांतराचा प्रश्नही काही काळ प्रलंबित राहिला. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तो मार्गी लागल्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, कामाचा वेग संथ राहिल्याने अडीच वर्षांनंतरही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.

७५ लाखांचा अपेक्षित निधी नव्हे, तर १३५ लाखांची तरतूद

कॅन्टीनच्या इमारत बांधकामासाठी ४८ लाख रुपये, तर स्वयंपाक खोली आणि जेवणाच्या साहित्याकरिता ८७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजेच या प्रकल्पासाठी एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद आहे. कॅन्टीन सुरू झाल्यानंतर पाच रुपयांत नाश्ता आणि दहा रुपयांत जेवण मिळणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.