

निपाणी : शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या यमगर्णी येथील वेदगंगा नदी कोरडी पडली असल्याने पाण्याचा उपसा बंद झाला आहे. जवाहरलाल तलावात सोमवारी फक्त ३१ फूट ३ इंच पाणीसाठा होता. त्यामध्ये सुमारे २२ फूट गाळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निपाणी शहराला अभूतपूर्व अशी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पालिका प्रशासनाच्यावतीने सोमवारी तलाव परिसरात पाहणी करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त गणपती पाटील, असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर हुद्दार, कनिष्ठ अभियंता दस्तगीर पठाण, पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर प्रवीण कणगले, सर्जेराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
तलावातील उपलब्ध पाणीसाठा शहर व उपनगराला किती दिवस पुरणार, याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. शहरातील ९८ सार्वजनिक कूपनलिका सध्या कार्यरत आहेत. खासगी कूपनलिका ताब्यात घेऊन त्यावर मोटार बसवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच खुल्या विहिरी व खासगी विहिरींना ताब्यात घेऊन नागरिकांना पाणी देता येते का, याची चाचपणी केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आवश्यक तेथे कूपनलिका खोदाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला जाणार आहे.
शहर व उपनगराला जवाहरलाल तलावातील पाण्याचा पुरवठा होत असला तरी गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. गढूळ पाण्यामुळे नागरिकांना पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक जलशुद्धीकरण केंद्रावरून १० रुपयास वीस लिटर मिळणारे पाणी खरेदी करत आहेत. निपाणी नगरपालिकेसमोर ५ रुपयांमध्ये वीस लिटर पाणी मिळते. शहरात नेहरू चौक, गुरुवार पेठ, गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. या ठिकाणी पाणी नेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.
प्रशासनाची अमृत २ योजनेवर भिस्त
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने निपाणीकरांच्या घशाला कोरड पडली आहे. नगरपालिका प्रशासनाची भिस्त आता अमृत २ पाणी योजनेवर आहे. शहरासाठी या योजनेतून ३२ कोटी ८३ लाख रुपये योजनेची कामे सुरू झाली आहेत. पालिका आयुक्त गणपती पाटील सोमवारी पालिकेसमोर धरणे आंदोलन करणार्या आम्ही निपाणीकर नागरिकांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे, यमगर्णी जॅकवेल येथे ५०० अश्वशक्तीच्या मोटारी बसवल्या जाणार आहेत. ७.७ किमी लांबीची नवी एमएस पाईपलाईन घालण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
जवाहरलाल तलाव येथे १० लाख व अकोळ रोड हुडको कॉलनी येथे ५ लाख लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड टॅंकचे काम सुरू आहे. जवाहरलाल तलावापासून एमबी टॅंकपर्यंत नवी पाईपलाईन घालण्यात आली आहे. शहरात वीस ठिकाणी व्हॉल्व बसवून पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी काही ठिकाणी व्हॉल्व बसवले जाणार आहेत. पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्यास नगरपालिकेच्या कूपनलिकांमधून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच नव्या कूपनलिका खोदाई केल्या जाणार असल्याचे म्हटले आहे.