

निपाणी : सौंदलगा (ता. निपाणी) येथील प्राथमिक आयुष्मान आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह दोन कर्मचारी विनापरवानगी गैरहजर असल्याचे शनिवारी तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या अचानक पाहणीत निदर्शनास आले. प्रजासेवा कार्यक्रमानिमित्त गावात आलेल्या तहसीलदारांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन हजेरी पुस्तक तपासले. गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीवेळी केंद्राचे डॉ. सलीम मुजावर तसेच दोन प्रथम दर्जा सहाय्यक कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित नसल्याचे आढळले. संबंधितांनी कोणतीही रजा अथवा पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे हजेरी रजिस्टरवरून स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार मुंजे यांनी चिकोडीचे अपर जिल्हा वैद्याधिकारी एस. एम. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. गैरहजर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी तहसीलदारांनी संबंधित डॉक्टरांशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून कर्तव्यावर नियमित उपस्थित राहण्याबाबत कडक शब्दांत सूचना केली.
आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशीही तहसीलदारांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनी केंद्रातील विविध गैरसोयींचा पाढा त्यांच्यासमोर मांडला. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तहसीलदारांच्या अचानक पाहणीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. यावेळी ता. पं. कार्यालयीन अधीक्षक सुदीप चौगुला, उपसंचालक चंद्रकांत नंदगावी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.