sub-registrar office| निपाणी उपनोंदणी कार्यालय आज सुरू राहणार
निपाणी : येथील उपनोंदणी कार्यालय रविवार, दि. 8 रोजी सुरू राहणार आहे. जमीन खरेदी-विक्री तसेच उपनोंदणी आणि मुद्रांक संदर्भातील कामकाज गतिमान व्हावे, नागरिकांची गैरसोय टाळावी आणि सरकारच्या महसूलातही वाढ व्हावी, या उद्देशाने राज्यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच प्रत्येक रविवारी उपनोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.
यासाठी प्रत्येक उपनोंदणी कार्यालयास स्वतंत्र तारीख देण्यात आली असून, यादिवशी रविवारीही नेहमीप्रमाणे संबंधित कार्यालयात उपनोंदणीचे सर्व कामकाज चालणार आहे. निपाणीत रविवार, दि. 8 रोजी उपनोंदणी कार्यालय सुरू राहणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपनोंदणी कार्यालयांतर्गत खरेदी-विक्रीबरोबरच बक्षीसपत्र, फोडी, विविध करार, ट्रस्ट नोंदणी, मुखत्यारपत्र, तारण आधी विविध कामे केली जातात. अनेकदा ही कामे नागरिकांना आपल्या वेळेनुसार करणे शक्य होत नाही. यातून वेळ आणि पैसा खर्च होतो. काही नागरिक तर या कारणामुळेच कामे करण्यास विलंब करतात. याचा सरकारच्या महसूलावरही परिणाम होतो.
या कामांमधून स्टॅम्प ड्युटी, सेस, सरचार्ज, नोंदणी शुल्क आदी प्रकारे महसूल मिळतो. त्यामुळे या सर्वांची दखल घेऊन सुट्टीच्या दिवशीही उपनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक खात्याच्या वतीने घेण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 18 उपनोंदणी कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयास दोन महिन्यातून एकदा ठरावीक तारीख दिली जाणार आहे. त्यादिवशी ते कार्यालय सुरू राहणार आहे. त्याप्रमाणे मुडलगी कार्यालय 1 जून रोजी सुरू होते. आता निपाणी 8 जून, बेळगाव 14 जून, बैलहोंगल 15 जून, अथणी 22 जून, चिकोडी 28 जून, संकेश्वर 29 जून, कागवाड 6 जुलै, बेळगाव दक्षिण 12 जुलै, गोकाक 13 जुलै, हुक्केरी 20 जुलै, खानापूर 26 जुलै, सदलगा 27 जुलै, कित्तूर 3 ऑगस्ट, रायबाग 9 ऑगस्ट, रामदुर्ग 10 ऑगस्ट, मुरगोड 17 ऑगस्ट आणि सौंदत्ती 23 ऑगस्ट अशा पद्धतीने संबंधित उपनोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.
नागरिकांनी सोयीचा लाभ घ्यावा
रविवारी निपाणीतील कार्यालय सुरू असणार आहे. यादिवशी कार्यालयातून खरेदी-विक्रीबरोबरच बक्षीसपत्र, फोडी, विविध करार, बँक बोजा आदी सर्वच कामे नेहमीप्रमाणे होणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयाच्या अखत्यारितील काम येथे करता येणार आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी दिवसभर सुट्टी काढून यावे लागू नये यासाठी शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी उपनोंदणी कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय झाला असून नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निपाणीतील उपनोंदणी कार्यालयाचे अधिकारी मनोहर कोरे यांनी केले.

