निपाणी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून जाणार्या मांगूर येथील सराफ व्यावसायिकाला जत्राट-जैनवाडी रोडवर भिवशीजवळ भरदिवसा लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वा. घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघा लुटारूंनी शस्त्राचा धाक दाखवून सराफाला दुचाकीवरून खाली पाडून त्याच्याजवळ असलेल्या बागेतील 7 तोळे सोने व 5 किलो चांदी व रोकड, मोबाईल असा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. एकाने दुचाकीवरून तर दोघांनी उसाच्या शेतातून पलायन केले.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून सराफ संबंधित सराफ व्यावसायिकाला निपाणी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. मांगूर येथील धोंडिराम विष्णू कुसाळे यांचे श्रीपेवाडी येथे सराफी पेढी आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ते रोजचा व्यवहार करून सायंकाळी पाचच्या सुमारास मूळगावी दुचाकीवरून भिवशी-जैनवाडी मार्ग गावाकडे जात होते. दरम्यान, भिवशी ते जैनवाडी या टापूत ते आल्यानंतर मागून येणार्या दुचाकीवरील तिघा लुटारूंनी सराफ कुसाळे यांच्या दुचाकीला मागून लाथ मारून त्यांना शस्त्राचा धाक दाखवला यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली त्यामुळे ते खाली कोसळले. कुसाळे यांनी डोक्यावर हेल्मेट घातल्याने ते बचावले. मात्र, लुटारूंनी त्यांच्या गाडीवर असलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची बॅग तसेच खिशातील मोबाईल लंपास केला.
त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरात असलेल्या शेतकर्यांनी धाव घेत याची माहिती निपाणी पोलिसांना दिली. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी सहकार्यांसह धाव घेतली. पोलिसांनी तसेच नागरिकांनी उसात पळून गेलेल्या लुटारूंचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.