

निपाणी: स्तवनिधी येथील ब्रह्मदेवाच्या विशाळी यात्रेची सोमवारी रथोत्सवाने सांगता झाली.यात्रेनिमित्त महाराष्ट्र,गोवा,आंध्र प्रदेश,कर्नाटकातील लाखो भाविकांनी ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले. रविवारी श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, नांदी मंगल,जलाभिषेक झाला. त्यानंतर नवखंड पार्श्वनाथ तीर्थंकरास अभिषेक, दुपारी क्षेत्रपाल ब्रह्मदेवाची विधिवत पूजा, महाभिषेक व आरती झाली.सायंकाळी पालखी उत्सव सोहळा पार पडला.दरम्यान दोन दिवसात लाखावर भाविकांनी श्रीक्षेत्र स्तवनिधी येथे उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले.
सोमवारी गव्हाण,तवंदी येथील भाविकांतर्फे यात्रा साजरी केली.अनिल कलाजे, राजू चौगुले, धीरज पंडित यांच्या पौरोहित्याखाली धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी चारच्या सुमारास रथोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी भाविकांनी रथ ओढला. त्यानंतर प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता झाली. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष आर.बी.खोत, उपाध्यक्ष सुंदर पाटील, सचिव बाळासाहेब मगदूम, जॉईंट सेक्रेटरी आनंद उगारे, प्रा. विलास उपाध्ये, सुंदर पाटील, किरण पाटील, इंद्रजीत पाटील, भरत पाटील, राजू दौडणावर, विकास कागे, सुनील बल्लोळ वृषभ बाळीकाई, सुधर्म चव्हाण, सुधाकर नाडगे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
यात्रेत भाविकांना दर्शनासाठी कमिटीतर्फे विशेष सोय केली होती. दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर सीपीआय बी.एस.तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.