

मधुकर पाटील
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी गावच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निखील नितीन बोंगाळे (वय ३४, रा. बिरोबा माळ, लेटेक्स कॉलनी, निपाणी) या तरुणाचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्त्या मुलाच्या अकाली निधनाने कोसळलेला दुःखाचा डोंगर उराशी बाळगत, बोंगाळे कुटुंबीयांनी निखीलचे अवयव दान करण्याचा अत्यंत धाडसी व हृदयस्पर्शी निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाच गरजू रुग्णांना नवे जीवनदान मिळाले असून, बोंगाळे कुटुंबाने समाजासमोर माणुसकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
निखील बोंगाळे यांचे मूळ कुटुंब बेळगावचे असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते निपाणी येथे वास्तव्यास आहेत. निखील एका खासगी कंपनीत मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होता. रविवारी रात्री तो यमगर्णी येथील मित्राला भेटायला जातो असे सांगून दुचाकीवरून निघाला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास यमगर्णीजवळ त्याची दुचाकी घसरून गंभीर अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि पोलिसांनी त्याला तातडीने निपाणीतील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज सोमवारी अखेर संपली.
निखीलच्या निधनाची बातमी समजताच आई मीनाक्षी, वडील नितीन, पत्नी शीतल आणि भाऊ नीलेश यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले. निखीलच्या पश्चात अवघ्या चार वर्षांची चिमुकली मुलगी मधुरा आणि चार महिन्यांचा निष्पाप मुलगा कृष्णांश असा परिवार आहे. अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंगातही कुटुंबीयांनी अश्रू आवरत निखीलचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली. निखीलवर मंगळवारी रात्री उशिरा निपाणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताबाबत निखीलचा भाऊ नीलेश बोंगाळे याने बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कोल्हापूर येथील रुग्णालयाने अवयव प्रत्यारोपणासाठी पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला पाचारण केले. मंगळवारी सायंकाळी बोंगाळे कुटुंबीयांच्या कायदेशीर संमतीनंतर अवयवदानाची गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये निखीलचे हृदय, फुफ्फुस, दोन्ही किडन्या, यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅनक्रियाज) ही अवयवे दान करण्यात आली. निखील जरी जगातून गेला असला, तरी त्याचे अवयव पाच गंभीर रुग्णांच्या शरीरात नवे जीवन बनून धडधडत राहणार आहेत.