

निपाणी : निपाणी-चिकोडी रस्त्यावरील मॅग्नम चित्रपटगृहासमोर असलेल्या 'वांकल स्टील आर्ट' या दुकानाला मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, निपाणी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने शेजारील इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली.
कृष्णा देवासी यांच्या मालकीचे 'वांकल स्टील आर्ट' हे दुकान गेल्या काही काळापासून या परिसरात कार्यरत आहे. या ठिकाणी स्टीलचे जिने, संरक्षक गार्ड, अक्षरे आणि घरासाठी लागणाऱ्या इतर स्टील साहित्याची निर्मिती व विक्री केली जाते. मंगळवारी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे देवासी दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर काही वेळातच दुकानातून धुराचे लोट बाहेर पडताना शेजारील व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मालक कृष्णा देवासी आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे निरीक्षक एस. एन. नांगनुरे आणि कर्मचारी उदय पट्टण यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. दुकानात ज्वलनशील साहित्य आणि रसायने असण्याची शक्यता असल्याने आगीचे गांभीर्य ओळखून हेस्कॉम प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे या दुकानाला लागून असलेल्या इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान टळले.
आग विझली असली तरी शॉर्ट सर्किटमुळे दुकानातील तयार माल, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे. यामध्ये देवासी यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी आणि व्यापारी वर्गाने मोठी गर्दी केली होती.