Nipani News : शिप्पुरमध्ये आगीचे तांडव! राहत्या घरासह गोठ्यातील साहित्य जळून खाक

आगीत १२ लाखांचे नुकसान, दोन कुटुंबे उघड्यावर; मदतीची प्रतीक्षा
Nipani News : शिप्पुरमध्ये आगीचे तांडव! राहत्या घरासह गोठ्यातील साहित्य जळून खाक
Published on: 
Updated on: 

निपाणी : शिप्पुर (ता. हुक्केरी) येथील चंदनगिरी गल्लीत शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे घरासह शेजारील जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत सागर बाबुराव ठक यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आणि बाबू कृष्णात मगदूम यांच्या गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत दोन्ही कुटुंबांचे मिळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिप्पुर येथील चंदनगिरी गल्लीत सागर ठक यांचे घर असून त्याला लागूनच बाबू मगदूम यांचा जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी दुपारी घरात कोणीही नसताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घरातून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. घराला लागलेली आग शेजारील गोठ्यापर्यंत पोहोचल्याने गोठ्यातील लाकडी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच उत्तम खराडे, विघ्नेश केसरकर, अण्णाप्पा खराडे, संजय माने, वैभव खराडे, गणेश खराडे, विनायक खराडे, सौरभ खराडे, सर्जेराव आरडे, सुधीर पाचील आणि विजय खराडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने संकेश्वर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचा बंब दाखल झाल्यानंतर जवान आणि ग्रामस्थांनी संयुक्त प्रयत्नांतून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे परिसरातील इतर घरांना आगीची झळ बसण्यापासून वाचवण्यात यश आले.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन सणासुदीच्या दिवसांतच राहते घर व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. महसूल विभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून बाधित कुटुंबांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लाखोंचे नुकसान; शासकीय मदतीची प्रतीक्षा!

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे राहते घर, तर दुसऱ्या कुटुंबाच्या गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले. दोन्ही कुटुंबांचे मिळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही दुर्घटना घडल्याने दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून बाधितांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news