

निपाणी : ज्या क्रिकेटने ओळख दिली, ज्या मैदानाने नाव दिले, त्याच मैदानावर एका अवलिया क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला. निपाणीतील 'झुंजार स्पोर्ट्स क्लब'चे माजी खेळाडू रियाज उर्फ चांद नूरमहम्मद उस्ताद (वय ५१) यांचे रविवारी सकाळी क्रिकेट खेळत असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक खेळाडूच नव्हे, तर क्रिकेटचा एक चालता-बोलता इतिहास हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
नेहमीप्रमाणे रविवारची (दि. २१) ती सकाळ उत्साहाने भरलेली होती. म्युन्सीपल हायस्कूलच्या हिरवळीवर रियाज आपल्या सवंगड्यांसोबत क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघाले होते. बॅट आणि चेंडूचा तो आवाज त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. मात्र, सकाळी ९ च्या सुमारास काळाने झडप घातली. खेळता खेळता अचानक रियाज यांच्या छातीत कळ आली आणि ते कोसळले. मित्रांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि मैदानावर पसरलेल्या या उत्साहावर एका क्षणात शोककळा पसरली.
रियाज उस्ताद हे केवळ स्थानिक खेळाडू नव्हते. ९० च्या दशकात त्यांच्या नावाचा दबदबा होता. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांतील मैदाने त्यांनी आपल्या खेळाने गाजवली होती. रणजी क्रिकेटपर्यंत मजल मारून त्यांनी आपल्या निपाणी शहराचे नाव क्रीडा विश्वात उंचावले होते. ज्यांच्या खेळाकडे पाहून अनेक तरुण क्रिकेटकडे वळले, तोच मार्गदर्शक आज कायमचा शांत झाला, अशी भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
रियाज यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी भीमनगर येथील कबरस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केवळ त्यांचे कुटुंबीयच नव्हे, तर त्यांचे अनेक जुने मित्र, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते आणि ओठांवर एकच चर्चा ‘ज्या खेळावर जीवापाड प्रेम केलं, त्याच खेळाच्या मैदानात रियाजने अखेरचा श्वास घेतला.’