

निपाणी : खरीप हंगाम साधण्यासाठी येथील कृषी विभागाने अनुदानावरील बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तयारी चालवली आहे. हंगामासाठी १०० क्विंटलवर सोयाबीनसह अन्य बियाणे खात्याकडून मागविण्यात आले आहे.८ जून रोजी मृग नक्षत्र निघणार आहे. त्यामुळे येथील रयत संपर्क केंद्राने बियाण्याच्या मागणीसह बियाणांची उपलब्धता आणि त्याचे वाटप अशा पातळीवर तयारी सुरू ठेवली आहे. जवळपास १८ हजार हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र राहील,असा अंदाज कृषी खात्याच्या रयत केंद्राने वर्तविला आहे.
निपाणी रयत संपर्क केंद्र कक्षेत सुमारे २९ गावांचा समावेश होतो. या गावातील शेतकरी कृषी खात्याकडून अनुदानावर दिल्या जाणाऱ्या बियाण्यांचा लाभ घेतात. दरवर्षी खात्याकडून मे महिन्यात खरीप क्षेत्र व आवश्यक बियाणे याबद्दल विचारणा केली जाते. यात सोयाबीनसह उडीद, मूग व तूर बियाणे मागविण्यात आले आहेत. यंदा रयत संपर्क केंद्राने सोयाबीन बियाण्यात जे-३३५ आणि ९३०५ यासह इतर जातीच्या बियाणांची मागणी केली आहे. दरवर्षी २० मे च्या सुमारास बियाणे दाखल होतात.
मात्र यंदा उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने महिनाअखेर बियाणे दाखल होऊन त्यानंतर बियाण्यांचे वाटप अक्कोळ रोडवरील एपीएमसी कार्यालय आवारात होणार आहे. यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीसह गावागावांत बियाणे वाटपाचे नियोजन रयत केंद्राने चालविले आहे. मध्यप्रदेश येथून आठवड्याभरात बियाणे दाखल होतील, अशी माहिती रयत संपर्क केंद्राने दिली.
शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून वळीव पावसाने दोनवेळा हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे बियाण्यांची जमवा, जमव, पेरणीची तयारी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दरवर्षी तालुक्यातील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या माध्यमातून बियाण्यांचे वाटप केले जात होते, पण गतवर्षी निपाणी शहरात आणि ग्रामीणमध्ये मिळून मोजक्या केंद्रातून बियाण्याचे वाटप झाले होते.
एकाच गावात दोन ते तीन पीकेपीएस असल्याने कोणत्या पीकेपीएसला बियाणे वाटपासाठी द्यायचे? अशी अडचण कृषी अधिकाऱ्यांची आहे. पीकेपीएसच्या माध्यमातून बियाणे दिल्यास खेड्यातील शेतकऱ्यांना बियाण्यासाठी निपाणीत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एकूणच कृषी खात्याने खरीपासाठीची जयत तयारी केली आहे.