

निपाणी : शहरात बुधवारी निपाणी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी फलक हटवावेत दुकानावर कन्नड फलक लावावेत, अशा सूचना हॉटेल व्यावसायिक, कापड दुकानदार व इतर व्यवसायिकांना केल्या. ऐन सणासुदीच्या काळात करण्यात येणार्या या सक्तीमुळे व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. बुधवारी बसस्थानक परिसरातील विविध व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुकानावर ६० टक्के कन्नड व ४० टक्के मराठी फलक लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच काही फलक हटविण्याचा प्रयत्न केला.
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या सणाच्या धामधुमीत व्यावसायिक असताना निपाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कन्नड फलकांची सक्ती करण्यात आल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर म्हणाले, निपाणी शहर महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवरील गाव आहे. येथे बहुतांश व्यवहार मराठीतून चालतात. त्यामुळे कन्नड फलकाची सक्ती करणे अन्यायकारक आहे. कोणीतरी फतवा काढते आणि त्याची अंमलबजावणी पालिकेकडून होते हे चुकीचे आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे यावेळी कन्नड फलकाची सक्ती करणे चुकीचे आहे.
पालिकेच्या महसूल विभागाचे सुनील कांबळे, बाबू खातेदार, आकाश कांबळे, आरोग्य विभागाचे विनायक जाधव, राजपूत, संपत कुरणे यांच्यासह पालिकेचे अधिकारी बसस्थानक परिसरात फिरून व्यावसायिकांना सूचना करत होते.