

निपाणी : घरातील कचरा समजून चुकून नगरपालिकेच्या घंटागाडीत गेलेले सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने निपाणी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधून काढत प्रामाणिकपणे संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे निपाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहराबाहेरील प्रगतीनगर परिसरातील रहिवासी सुशीला बल्लारी यांनी नेहमी वापरत असलेले सुमारे दोन तोळे वजनाचे दोन सोन्याचे हार एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे नगरपालिकेची घंटागाडी त्यांच्या घरासमोर कचरा संकलनासाठी आली. त्यावेळी सुशीला बल्लारी या घराबाहेर गेल्या होत्या. त्यांचा मुलगा कपिल बल्लारी याने सदर प्लास्टिक पिशवीतील वस्तू कचरा असल्याचे समजून ती इतर कचऱ्यासोबत घंटागाडीत टाकली.
काही वेळाने सुशीला बल्लारी घरी परतल्यानंतर दागिन्यांची पिशवी कचऱ्यात गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कपिल बल्लारी यांनी तातडीने पट्टणकुडी हद्दीत असलेल्या नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पाकडे धाव घेतली. तेथे त्यांनी कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रकार सांगून दागिने शोधून देण्याची विनंती केली.
यावेळी घंटागाडीचे चालक विनायक ऐवाळे आणि कर्मचारी पिंटू सोनटक्के यांच्यासह अमर आवटे, विजय कुरंगे आणि महेंद्र कांबळे हे कर्मचारी प्रकल्पावर उपस्थित होते. बल्लारी यांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत या पाचही कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दागिन्यांचा शोध सुरू केला.सुमारे तासभर कचरा उपसून आणि तपासून अखेर कर्मचाऱ्यांना सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सापडली. त्यांनी ती कपिल बल्लारी यांच्या ताब्यात प्रामाणिकपणे सुपूर्द केली.
सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने सापडल्यानंतरही त्यावर कोणताही मोह न ठेवता संबंधित कुटुंबाला परत करणाऱ्या अमर आवटे, विनायक ऐवाळे, पिंटू सोनटक्के, विजय कुरंगे आणि महेंद्र कांबळे या कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीतून आजच्या काळातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
प्रामाणिकपणाला सोन्याची झळाळी!
सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कचऱ्यात गेल्याचे समजल्यानंतर संबंधित कुटुंबाच्या मदतीला निपाणी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी धावून आले. तासभर कचरा उपसून त्यांनी दागिन्यांची पिशवी शोधून काढली आणि क्षणाचाही मोह न ठेवता ती मालकाच्या स्वाधीन केली. अमर आवटे, विनायक ऐवाळे, पिंटू सोनटक्के, विजय कुरंगे आणि महेंद्र कांबळे यांच्या या प्रामाणिक कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.