Nipani Bus Fire : शॉर्टसर्किटमुळे मिनीबसला आग

तवंदी घाटातील घटना; चालकाच्‍या प्रसंगावधनामुळे सुदैवाने जीवितहानी टळली
Nipani Bus Fire : शॉर्टसर्किटमुळे मिनीबसला आग
Published on: 
Updated on: 

निपाणी : संकेश्वर येथील निलगार गणपतीचे दर्शन घेऊन परतत असताना मिनी बसला तवंदी घाटात रविवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर बसमधील सर्व १२ भाविकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. काही क्षणातच आगीने संपूर्ण मिनी बसला वेढा दिला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, बस जळून खाक झाल्याने सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. या वाहनात इचलकरंजी येथील एकाच कुटुंबातील १२ भाविक होते.

इचलकरंजी येथील विनायक मोहन साळुंखे हे मिनीबस चालवत होते. ते आपल्‍या कुटुंबीयांसमवेत निलगार गणपतीच्‍या दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्‍यानंतर ते सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले होते. तवंदी घाट उतारावर मिनीबस आली असता अचानक शॉर्टसर्किट होऊन वाहनाला आग लागली. ही बाब चालक साळुंखे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला घेतले आणि बसमधील सर्व भाविकांना बाहेर काढले. त्‍यानंतर काही क्षणांतच आगीने मिनीबसला वेढा दिला.

या घटनेची माहिती मिळताच शहरचे उपनिरीक्षक गंगाप्‍पा पुजेरी यांनी निपाणी व संकेश्वर अग्‍निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे हेही कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले. अग्‍निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मनोहर बिलामारी, सी. एस. पम्मार, सचिन कट्टी व रवी हेगडे यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत मिनी बसचे मोठे नुकसान झाले.

एकाच कुटुंबातील १२ जण सुखरूप

मिनीबसला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच चालक विनायक साळुंखे यांनी तातडीने वाहन बाजूला घेतले. त्यानंतर बसमधील सर्व १२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. भाविक खाली उतरल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news