

निपाणी : ऑनलाईन ट्रेडिंग व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे मानसिक तणावातून निपाणीतील एका एमबीए विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आदित्य अरुण तहसीलदार (वय २४, रा. बडमंजी प्लॉट, निपाणी) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आदित्यचे मूळ गाव मच्छे (ता. बेळगाव) असून त्याचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून निपाणी येथे वास्तव्यास आहेत. आदित्य निपाणीतील एका महाविद्यालयात एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील अरुण तहसीलदार हे चिकोडी येथील अबकारी विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
शुक्रवारी सकाळी आदित्यने वडिलांना दुचाकीवरून बसस्थानकावर सोडले. त्यानंतर तो घरी परतला. काही वेळाने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सीपीआय बी. एस. तळवार आणि शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी आदित्यजवळ सुसाईड नोट आढळून आली. ऑनलाईन ट्रेडिंग व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदित्यच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी त्याचे वडील अरुण तहसीलदार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी पुढील तपास करीत आहेत.